पुणे: बनावट दस्तप्रकरणात माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा मुलगा करण व सासरे सुखेन शाह अडचणीत

0
IMG_20250530_002111.jpg

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा मुलगा करण मानकर आणि त्याचे सासरे सुखेन शाह यांच्यावर बनावट दस्त तयार केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समर्थ पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी शंतनू सॅम्युअल कुकडे, रौनक जैन यांच्यासह इतरांचीही गुंतवणूक आहे.

समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी शंतनू कुकडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्यावर सामूहिक बलात्काराचा दुसरा गुन्हा नोंदवण्यात आला. तपासादरम्यान शंतनू कुकडे व रौनक जैन यांच्या खात्यांतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले.

ही आर्थिक देवाणघेवाण तपासताना करण मानकर, दीपक मानकर व सुखेन शाह यांच्या खात्यांतही लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान करण मानकर याने सांगितले की, डोणजे येथे दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शंतनू कुकडे याच्याकडून त्याला पाच कोटींचे कर्ज देण्यात आले असून त्यासंबंधी ५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर ४० वर्षांसाठी करार करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या तपासात हा करारनामा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित दस्त क्रमांक दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर नोंदवलेला असल्याचेही निष्पन्न झाले.

दुसऱ्या प्रकरणात सुखेन शाह यांनी त्यांच्या मुलाच्या नावे पिंपरी परिसरात रिसॉर्ट उभारण्यासाठी शंतनू कुकडे याच्याकडून तब्बल ६ कोटी ५२ लाख रुपये घेतल्याचे उघड झाले. यासाठी करण्यात आलेला करारनामादेखील बनावट असल्याचे तपासातून समोर आले आहे. या प्रकरणातही दस्त क्रमांक दुसऱ्या व्यक्तीला वाटप करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये करण मानकर, सुखेन शाह, शंतनू कुकडे, रौनक जैन व इतरांवर स्वतंत्रपणे गुन्हे नोंदवण्यात आले असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed