पुणे: खंडणी प्रकरण: पोलिस उपनिरीक्षकावर कठोर कारवाई, CP अमितेश कुमार यांचा निर्णय
पुणे: ज्येष्ठ नागरिकाला महिलेच्या जाळ्यात अडकवून खंडणी वसुलीप्रकरणी पुणे पोलिस दलातील उपनिरीक्षक काशिनाथ उभे यांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या बडतर्फीचे आदेश जारी केले.
उभे यांनी कायद्याचे ज्ञान असूनही, त्यांचे कृत्य समाजविघातक आणि पोलिस दलाच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारे असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. कोथरुड परिसरातील एका ज्येष्ठ व्यक्तीला एका महिलेने आपल्या मोहजालात अडकवून, त्याच्याकडून बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. उभे आणि तीन महिलांनी त्या व्यक्तीला लक्ष्मी रस्त्यावरील हॉटेलमध्ये मारहाण केली.
या प्रकरणी 30 जुलै रोजी विश्रामबाग पोलीस ठाण्यात उभे आणि तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर उभे यांना निलंबित करण्यात आले होते. चौकशीत दोषी आढळल्याने आता त्यांची बडतर्फी करण्यात आली आहे.