पुणे: शिक्षण उपनिरीक्षक लाचप्रकरणात येरवडा कारागृहात
पुणे: विना वेतन काम करणाऱ्या एका शिक्षिकेचा ‘शालार्थ आयडी’ मंजूर करण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या गंभीर प्रकरणात अडकलेले शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब भगवान मिरगणे (५७, रा. हडपसर) यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवार, दि. २५ रोजी मिरगणे यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली होती. प्राथमिक चौकशीत त्याच्या ताब्यातून एक लाख २० हजार रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर हडपसर येथील ग्रीनव्हील सोसायटीमधील त्यांच्या घरावर टाकलेल्या झडतीत ५६ हजार रुपयांची अतिरिक्त रोकड सापडली.
दरम्यान, मिरगणे यांनी आपल्या वतीने अॅड. मिलिंद पवार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्या अर्जावर बुधवार (दि. ३) रोजी सुनावणी होणार आहे. शिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराच्या या प्रकरणामुळे विभागात खळबळ उडालेली आहे.