पुणे; आरटीओ ऑफिस जवळ ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहिमेच्या वेळी मोठा अपघात, महिला पोलीस गंभीर जखमी, चालक ताब्यात
पुणे शहरातील अपघातांचे सत्र काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही. रविवारी मध्यरात्री आणखी एक दुर्दैवी घटना घडली असून, नाकाबंदी दरम्यान एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला भरधाव चारचाकी वाहनाने उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना नायडू लेन, आरटीओ ऑफिसजवळ घडली. दीपमाला राजू नायर (वय 35) असे गंभीर जखमी झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्या बंडगार्डन वाहतूक विभागात कार्यरत आहेत. त्या वेळी वाहतूक विभागाच्या ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहिमेअंतर्गत नाकाबंदी लावण्यात आली होती.
अपघाताचा थरार
मध्यरात्री वाहनांची तपासणी सुरू असताना, एका भरधाव चारचाकी वाहनाने नाकाबंदीत थेट घुसून नायर यांना जोरदार धडक दिली. स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करूनही त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाहनचालकाला अटक
या घटनेनंतर संबंधित वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी सुरक्षित वाहतुकीचे आवाहन केले आहे.
पुण्यात अपघातांचे प्रमाण वाढतेच
पुणे जिल्ह्यात अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवूनही रोज नवनवीन अपघात समोर येत आहेत. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या गंभीर स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने आणखी कठोर उपाययोजना राबवण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे.
—