पुणे: झाड कोसळले, खड्ड्यात पडले तर चिंता नको: महापालिकेकडून वैद्यकीय खर्चाची भरपाई

पुणे – शहरात झाड कोसळून, खड्ड्यात पडून किंवा महापालिकेच्या कामातील चुकीमुळे नागरिक जखमी झाले किंवा मृत्यू झाला, तर संबंधितांना आर्थिक मदत आणि मोफत वैद्यकीय उपचार महापालिकेकडून देण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी या प्रस्तावावर तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
कात्रज परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली. या वेळी आयुक्तांनी अशा घटनांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
दुर्घटनांमध्ये वाढ
गेल्या दोन महिन्यांत शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. दत्तवाडीत एका ज्येष्ठ महिलेला, तर काही दिवसांपूर्वी तीन वर्षांच्या मुलीवर हल्ला झाला. कात्रजमध्ये गुरुवारी रात्री पाच वर्षाच्या मुलावर हल्ला झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
मोफत उपचारांची सुविधा
महापालिकेच्या शहरी गरीब योजनेअंतर्गत पॅनेलवरील रुग्णालयात अशा जखमींचे मोफत उपचार करण्यात येणार आहेत. झाड कोसळून किंवा महापालिकेच्या त्रुटींमुळे झालेल्या दुर्घटनांमध्येही तातडीने मदत देण्यात येईल. मृत्यू झाल्यास संबंधितांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
अंदाजपत्रकात विशेष तरतूद
दुर्घटनाग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी महापालिकेच्या २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात विशेष अर्थशिर्ष तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मदतीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असून दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना तातडीने आधार मिळण्याची अपेक्षा आहे.