पुण्यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची दारु पिऊन सहा गाड्यांना धडक

पुणे : शहरात पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना अद्याप थंड झालेल्या नाहीत, तोपर्यंतच पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रतिमेला धक्का देणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रांजणगाव एमआयडीसी येथे कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने दारूच्या नशेत कार चालवून सहा वाहनांना जबर धडक दिली. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले असून, आरोपी पोलीसावर अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे हे रविवारी रात्री एका पार्टीला गेले होते. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केले. त्यानंतर त्यांनी दारूच्या नशेत कारने पुणे-नगर महामार्गावरून जात असताना बेफाम वेगात वाहन चालवत सहा वाहनांना जोरदार धडक दिली.
या अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असून, काहींची अवस्था चिंताजनक आहे. मात्र, आश्चर्य म्हणजे पोलिसांनी या घटनेत केवळ गुन्हा दाखल करूनच आपली जबाबदारी संपवली. आरोपी कॉन्स्टेबल इनामेला ना अटक करण्यात आली, ना त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
या घटनाक्रमामुळे रांजणगाव पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत असून, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. “पोलिसांनी आपल्या सहकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न न करता, कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करावी,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, ग्रामीण पोलिस प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशीही सर्व स्तरांतून मागणी होत आहे.