पुणे शहर: “दिवाळीचा शिधा मिळणार की पुन्हा प्रतीक्षा?”
गणेशोत्सव होऊन पंधराहून अधिक दिवस उलटले असतानाही, शासनाने घोषित केलेला आनंदाचा शिधा अजूनही नागरिकांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे आता दिवाळीचा आनंदाचा शिधा वेळेत मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महिला सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ राबवून महिलांच्या खात्यात मासिक हप्ते जमा केले जात आहेत. मात्र सणांच्या काळात आनंदाचा शिधा वेळेत मिळेल की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर रेशन दुकानांवर आनंदाचा शिधा दिला जात आहे. १०० रुपयांत चार वस्तूंचा समावेश असलेला हा शिधा, गेल्या वर्षी नव्याने मैदा आणि पोहे यांच्यासह देण्यात आला. गौरी गणपती सणानिमित्त सप्टेंबर महिन्यात आनंदाचा शिधा वाटप करण्याची घोषणा सरकारने केली होती.
परंतु, यावेळी केवळ तेल, रवा, चणाडाळ आणि साखर या चारच वस्तू देण्यात आल्या, तर पोहे आणि मैदा यांची कपात करण्यात आली. पुरवठा यंत्रणेतील त्रुटी, सणांच्या आधी रेशन दुकानदारांचा संप आणि ई-पॉस यंत्रणेवरील ताण यामुळे शिधा वितरणात अडथळे आले आहेत. परिणामी, योजनेला अडथळे निर्माण झाले असून, शिधा वाटपावरून ही स्थिती स्पष्ट होत आहे.
प्रशांत खताळ, अन्न धान्य वितरण अधिकारी, पुणे शहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी गणपती सणाच्या आधी सप्टेंबर महिन्यात आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे. पुणे शहरातील ११ परिमंडळांतील ३ लाख २५ हजार शिधापत्रिकाधारकांपैकी ९२ टक्के शिधा वितरित झाला आहे. संप आणि ई-पॉस समस्येमुळे उर्वरित शिधापत्रिकाधारकांना सप्टेंबर महिन्यातील शिधा दिला जाईल. मात्र, यंदाच्या दिवाळीसाठी आनंदाचा शिधा वाटप होणार की नाही याबाबत कोणतेही आदेश अद्याप आलेले नाहीत.