पुणे शहर : खंडणीप्रकरणी दोन पोलिस निलंबित; पकडलेल्या तेलवाहू टँकरची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना न दिल्याने कारवाई, वाचा सविस्तर
पुणे- सोलापूर महामार्गावर एका तेलवाहू टँकरचालकाला अडवून अडीच लाखांची खंडणी उकळणाऱ्या तोतया पत्रकाराच्या संपर्कात असलेल्या गुन्हे शाखेतील दोन पोलीस शिपायांना पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी निलंबित केले आहे.
पोलीस हवालदार ज्ञानदेव गोरख गिरमकर आणि पोलीस नाईक शिरीष श्रीहरी गोसावी अशी निलंबित केलेल्या पोलीस शिपायांची नावे आहेत. २९ जून रोजी रात्री सोलापूर रस्त्यावर तेलवाहू टँकरचालकाला अडवून तोतया पत्रकार राहुल हरपळे आणि त्याच्या साथीदारांनी अडीच लाख रुपयांची खंडणी उकळली होती. याबाबत अण्णा चौगुले यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तेलवाहू टँकर पकडण्यात आला होता आणि टँकर सोडवण्यासाठी पोलीस तडजोड करत असल्याचा संदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया ग्रुपवर आला होता.
दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. हरपळेने टँकर पकडला होता आणि हरपळे पोलीस नाईक गोसावी याचा मित्र असल्याचे निष्पन्न झाले. गोसावी आणि गिरमकर त्या ठिकाणी गेले, मात्र त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवली नाही. दोघांनी टँकरची चावी आणि कागदपत्रे ताब्यात घेतली होती. हरपळेने टँकर सोडवण्यासाठी अडीच लाख रुपयांची खंडणी उकळली.
हरपळे आणि पोलीस कर्मचारी गोसावी, गिरमकर यांच्या मोबाइलची तपासणी करण्यात आली तेव्हा हरपळे आणि गोसावी, गिरमकर यांचा परस्पर संपर्क असल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस कर्मचारी गोसावी आणि गिरमकर यांचे वर्तन पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे असल्याचे चौकशीत सिद्ध झाले. त्यानुसार, दोघांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले असून, निलंबन कालावधीत त्यांना दररोज पोलीस मुख्यालयात हजेरी द्यावी लागणार आहे, असे आदेश पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले.