पुणे शहर : मुस्लिम को-ऑप बँकेच्या एटीएममधून सात लाख ७६ हजारांची रोकड चोरी; लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : कॅम्प परिसरातील एम. जी. रस्त्यावर असलेल्या मुस्लिम को-ऑप बँकेच्या एटीएममधून चोरट्यांनी सात लाख ७६ हजार रुपये चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सरफराज मेहबूब तडवी (वय ५५, राहणार कोंढवा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार लष्कर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तडवी हे मुस्लिम को-ऑप बँकेत अधिकारी आहेत. बँकेच्या कॅम्प शाखेतील एटीएमच्या सेट बॉक्समध्ये २० जुलै रोजी पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटा होत्या, ज्यांची एकूण रक्कम १० लाख २१ हजार रुपये होती. २४ जुलै रोजी एका ग्राहकाने एटीएममधून पैसे निघत नसल्याची तक्रार केली. तपास केल्यानंतर अज्ञात चोरट्याने एटीएम मशिन चावीने उघडून, त्यातील दोन कॅश सेट बॉक्समधून सात लाख ७६ हजार रुपये चोरी केले असल्याचे समोर आले. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.