पुणे: चंद्रकांत टिंगरे हल्ला प्रकरण; दोन आरोपींना अटक; शरद पवार गटात प्रवेश केल्याने हल्ला केल्याची कबुली

0
4e899a6344b64585735f72b1da6a276c1732014672025924_original.webp

विश्रांतवाडी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात प्रवेश करणारे माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. रेवण तानाजी लगस (वय २०, रा. गोकुळनगर, कात्रज) आणि प्राणजीत अच्युत शिंदे (वय २४, रा. हांडेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पक्षांतरामुळे वाद
चंद्रकांत टिंगरे आणि त्यांच्या पत्नी, माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. सुरुवातीला त्यांनी महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांना पाठिंबा दिला होता. मात्र, नंतर शरद पवार गटात प्रवेश करून त्यांनी राष्ट्रवादीच्या बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा जाहीर केला.

घटनेचा तपशील
रेखा टिंगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ नोव्हेंबर रोजी चंद्रकांत टिंगरे आणि त्यांचे चालक धानोरी येथील महावितरण कार्यालयासमोर गाडीत बसले असताना आरोपींनी गाडी अडवून दगडफेक केली आणि मारहाण केली.

राजकीय आरोप
रेखा टिंगरे यांनी माध्यमांशी बोलताना, “महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या सांगण्यावरून माझ्या पतीवर हल्ला करण्यात आला,” असा थेट आरोप केला आहे.

पोलिस तपासात खुलासा
“चंद्रकांत टिंगरे यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याचा राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केल्याचे चौकशीत समोर आले आहे,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत असून राजकीय वर्तुळात या घटनेची चर्चा आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed