पुणे: आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल, फसवणुकीचा आरोप – VIDEO
पुणे: पोलिस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, आणि पीएसआय यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. हे प्रकरण भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील गैरव्यवहाराशी संबंधित आहे, ज्यामध्ये मुख्य संशयित सुनिल झंवर यांनी गृहखात्याकडे तक्रार केली होती.
तक्रारीनुसार, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहखात्याच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, जळगावमधील छाप्यामध्ये सहभागी असलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांची नावे या प्रकरणात नमूद केली गेली आहेत.
पहा व्हिडिओ
सुनिल झंवर यांना बीएचआर गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आली होती, ज्यामध्ये त्यांनी मालमत्तेवर अनधिकृत मालकी हक्क घेणे आणि कागदपत्रात फेरफार केल्याचा आरोप होता. जामिनावर सुटलेल्या झंवर यांनी, पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत, ज्यामध्ये ते म्हणतात की, त्यांना राजकीय कारणांमुळे या प्रकरणात गोवण्यात आले. त्यांचा आरोप आहे की, त्यांच्या विरुद्ध खोटे एफआयआर दाखल करण्यात आले, त्यांच्या मुलाला विनाकारण सहा महिने कोठडीत ठेवण्यात आले, आणि तक्रारीत सरकारी दस्तऐवजात बदल करण्यात आले.
या सर्व प्रकरणात, भाग्यश्री नवटके व इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची तपासणी करण्याची आवश्यकता आहे, असे झंवर यांनी गृहखात्याकडे तक्रार नोंदवताना सांगितले आहे.