पुणे: नियमबाह्य दिलेले प्रवेश रद्द करा; तंत्रशिक्षण विभागाचे आदेश

n62999213817257822309143d41925a2318170108f609fe28347012bbf14ab159e44577d31b448ae3ce7d2a.jpg

पुणे – पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी या संस्थेने नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया राबविल्याची तक्रार प्राप्‍त झाली आहे. त्‍या पार्श्वभूमीवर राज्‍य सीईटी सेलचे नियम धाब्यावर बसवून संस्थास्तरावर राबविलेली प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश पुणे विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक डी. व्ही. जाधव यांनी दिले आहेत. त्‍यामुळे संस्‍थास्‍तरावरील प्रवेश अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.

राज्य सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडे युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी पीआयसीटीने राबविलेल्या नियमबाह्य प्रवेश प्रक्रियेबाबत लेखी तक्रार केली होती. त्यावर सीईटी सेलने तंत्रशिक्षण विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे डी. व्‍ही. जाधव यांनी परिपत्रक प्रसिद्ध करून पीआयसीटीने राबवलेले नियमबाह्य प्रवेश रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात कार्यालयास खुलासा सादर करण्याचेही सूचित करण्यात आले आहे.

सीईटी सेलच्या माध्यमातील नियमित प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्याशिवाय संस्थास्तरावर प्रवेश देता येत नाहीत; परंतु पीआयसीटीने 9 ऑगस्ट रोजी संस्थास्तरावरील प्रवेशाची माहिती प्रसिद्ध करून या जागांच्या प्रवेशाबाबत वेळापत्रक प्रसिद्ध केले, तसेच अंतिम गुणवत्ता यादीचा दिनांक 31 ऑगस्ट असा आहे. मात्र 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीत संस्थास्तरीय प्रवेश निश्चित दर्शविण्यात आले. त्यामुळे हे प्रवेश रद्द करावेत, असे तंत्र शिक्षण विभागाने पीआयसीटीला पत्राद्वारे कळविले आहे.

Spread the love