पुणे : हद्दीचा वाद; 6 कर्मचाऱ्यांना ‘ताकीद’ची शिक्षा..! एकाच पोलीस ठाण्यातील बीट मार्शलकडून हद्दीचा वाद

0

पुणे : हद्दीचा वाद घालून पोलीस गुन्हे दाखल करण्यास किंवा कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याच्या घटना आतापर्यंत पाहिल्या गेल्या आहेत. पण, ‘पुणे शहर पोलीस दलात’ हद्दीच्या वादाचे एक वेगळेचप्रकरण पाहिला मिळत आहे.

एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीट मार्शल ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी ‘ही आमची हद्द’ नाही (पोलीस चौकीची हद्द) म्हणत कॉलर करणाऱ्या त्या व्यक्तीला मदतीसाठी टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीट मार्शलवरील ६ कर्मचाऱ्यांना ‘ताकीद’ ही शिक्षा सुनावली आहे.

नागरिकांच्या मदतीला प्रथम पोहचत पुणे पोलिसांचा रिस्पॉन्स वाढविणाऱ्या या बीट मार्शलकडूनच हद्दीचा वाद घातला जात असल्याने पोलिसांच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

माहितीनुसार, कोथरूड भागातील उजवी भुसारी कॉलनी येथे एकजन चारचाकी दारूच्या नशेत चालवत असल्याची माहिती पोलीस नियत्रंण कक्षाला मिळाली. लागलीच नियत्रंण कक्षाकडून या कॉलची माहिती कोथरूड पोलिसांच्या हद्दीतील तीनही बीट मार्शलला दिली गेली. कॉलप्रमाणे प्रथम किसकिंदानगर बीट मार्शल घटनास्थळी पोहचले. मात्र, ही हद्द शास्त्रीनगर बीट मार्शलची (शास्त्रीनगर पोलीस चौकी) आहे, असे कळविले आणि निघून गेले. नंतर एरंडवणा बीट मार्शल ड्युटीवरील कर्मचारी तेथे गेले, त्यांनीही ही हद्द शास्त्रीनगर बीट मार्शलची आहे असे कळवत संबंधित बीट मार्शल घटनेची माहिती दिली. इतकच काय तर शास्त्रीनगर बीट मार्शलने या कॉलला रिस्पॉन्सच दिला नाही.

या एकूणच प्रकरणाने पोलीस नियत्रंण कक्षाला माहिती देणाऱ्या त्या नागरिकाला वेळेत मदत मिळाली नाही. तसेच, एकाच पोलीस ठाण्यात कर्तव्य करणाऱ्या मार्शलवरील कर्मचाऱ्यांनी हद्दीचा वाद घातला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा कसूरी अहवाल कोथरूड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना पाठविला होता. त्यानुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी “देय वार्षिक वेतनवाढ त्या पुढील वेतनवाढीवर परिणामकारक होणार नाही अशारितीने एक वर्षासाठी रोखणे” अशी शिक्षा दिली होती. परंतु, यानंतर संबंधित बीट मार्शलवरील कर्मचाऱ्यांनी याबाबत खुलासा केला व वरिष्ठांसमोर हजर होऊन घटनेची ‘कथन’ केले, त्यामुळे ही शिक्षा बदलून त्यांना ‘ताकीद’ ही शिक्षा दिली आहे. ही घटना जानेवारी महिन्यातील आहे.

मार्शल पुणे पोलिसांचा चेहरा….

बीट मार्शल म्हणजे, पुणे पोलिसांनी पुणेकरांना मदत तत्काळ मिळाली यासाठी सुरू केलेली सेवा आहे. एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत किमान तीन ते चार बीट मार्शल (चौकीनुसार असतात) आहेत. दिवसा व रात्री बीट मार्शल हद्दीत फिरतात. त्यासोबतच पुणे पोलिसांच्या नियत्रंण कक्षाला एखादा कॉल प्राप्त झाला तर नियत्रंण कक्ष प्रथम बीट मार्शलला माहिती देते. त्यानूसार बीट मार्शल घटनास्थळी दाखल होऊन मदत करते.

गंभीरप्रकरण असेल तर वरिष्ठांना तसेच पोलीस ठाण्याला माहिती देत अधिक मदत मागवतात. बीट मार्शलच्या घटनास्थळी पोहचण्याच्या वेळेवरच पुणे पोलिसांचा रिस्पॉन्स टाईमही पाहिला जातो. तसेच, हे बीट मार्शल पुणे पोलिसांचा चेहरा म्हणून देखील काम करत असतात. परंतु, अशा प्रकरणामुळे पुणे पोलिसांच्याच कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातात.

Link source: Navrashtra online

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed