पुणे : भुशी डॅमचं रेस्क्यू ऑपरेशन 29 तासानंतर संपलं, जाणून घ्या सविस्तर माहिती
पुणे : लोणावळ्यामधील धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यातला पाचवा चार वर्षांच्या बाळाचा मृतदेह सापडला आहे, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन संपलं आहे.
वाहून गेलेल्या पाच जणांपैकी तिघांचे मृतदेह काल सापडले होते, तर उर्वरित दोन मृतदेहांपैकी एक आज सकाळी आणि दुसरा संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सापडला. तब्बल 29 तासानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन संपलं आहे.
भुशी डॅमच्या बॅक वॉटर परिसरातील पाण्याच्या प्रवाहात अन्सारी कुटुंबातील 9 जण अडकले होते. त्यामध्ये दोन पुरुष, महिला, मुली आणि लहानग्यांचाही समावेश होता. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अन्सारी कुटुंबाला तिथून बाहेर पडणं कठीण झालं होतं, त्यामुळेच एकमेकांच्या आधाराने ते डोंगर उताराला पाण्याच्या वेगवान प्रवाहात पाय रोवून उभे होते. कुणी तरी मदतीला यईल आणि या मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढेल, अशी त्यांना आशा होती, म्हणूनचं ते मदतीसाठी धावा करत होते.
तिथे असलेल्या काहींनी झाडांच्या फांद्या मोडून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पाण्याचं रौद्र रुप पाहून तिथे असलेल्यांपैकी कुणी प्रवाहात जाण्याचं धाडस केलं नाही.
जवळपास चार मिनिटं ते कुटुंब त्या प्रवाहात घट्ट पाय रोवून उभे होते. पण त्यानंतर पाण्याचा वेग वाढत गेला आणि एक महिला लहानग्यासह प्रवाहासोबत वाहून गेली. त्यानंतर तिथे असलेल्या काही लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्याच्या वाहत्या दिशेनं धाव घेतली. दरम्यान बाकीचे लोक तिथचं प्रवाहात उभे होते. पण त्यांचा धीर सुटत चालला होता, कारण पाण्याचा वेग वाढत चालला होता. पाण्याच्या प्रवाहासमोर त्यांचा फार वेळ निभाव लागला नाही.
पुढच्या दोनचं मिनिटांत पाण्याचा प्रवाह त्यांना आपल्यासोबत घेऊन गेला. अवघ्या सहा मिनिटांत ते 9 जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. त्यापैकी पाच जणांचा बुडून मृत्यू झाला, तर चौघांना वाचवण्यात यश आलं आहे. पुण्यातील हडपसरच्या सय्यदनगरमधील अन्सारी कुटुंब रविवारी पावसाळी पर्यटनासाठी आलं होतं. भुशी डॅमच्या बॅक वॉटर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढला आणि अन्सारी कुटुंबातील 9 जण पाण्याच्या प्रवाहात अडकले आणि अवघ्या 6 मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं.