पुणे: मलनिस्सारण कामांतील त्रुटींवर कारवाई; शाखा अभियंता आकाश ढेंगे निलंबित
पुणे : हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील शेवाळेवाडी आणि मांजरी परिसरातील मलनिस्सारण व देखभाल कामांमध्ये झालेल्या गंभीर त्रुटींची दखल घेत पुणे महानगरपालिकेने शाखा अभियंता आकाश ढेंगे यांना निलंबित केले आहे. या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिले आहेत.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिवाळीच्या काळात या भागाची पाहणी केली असता अनेक ठिकाणी तुटलेले आणि धोकादायक स्थितीत असलेले चेंबर्स, तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डक्टची साफसफाई न केल्याचे आढळले. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.
या प्रकरणात मलनिस्सारण विभागाच्या कामकाजात गंभीर निष्काळजीपणा झाल्याचे निदर्शनास आले. तपासात शाखा अभियंता आकाश ढेंगे यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यांनी समाधानकारक खुलासा न केल्याने अखेर त्यांना निलंबित करण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीनंतर आठवड्याभरातच ही पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी टीडीआर प्रकरणात दोन अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई आयुक्त नवल किशोर राम यांनी केली होती.
या सलग कारवायांमुळे महापालिकेतील अभियंता वर्गात खळबळ उडाली असून, प्रशासनाने निष्काळजीपणावर शून्य सहनशीलतेचा इशारा दिला आहे.