पुणे: राजकीय फ्लेक्सबाजांना अभय, व्यावसायिकांवर कारवाई! महापालिकेच्या फ्लेक्सविरोधी मोहिमेत स्पष्ट भेदभाव; नागरिकांकडून संतापाची लाट

पुणे – शहराचे विद्रूपीकरण थांबवण्यासाठी पुणे महापालिकेने मोठ्या दिमाखात सुरू केलेली अनधिकृत फ्लेक्सविरोधी मोहीम आता स्वतःच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कारण, या मोहिमेत प्रशासनाकडून “दोन वेगवेगळे मापदंड” वापरले जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. व्यावसायिक फ्लेक्स लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात असताना, राजकीय फ्लेक्सबाज मात्र निर्धास्तपणे शहरभर झेंडे उडवत आहेत.
शहरातील प्रमुख चौक, विद्युत खांब, सिग्नलजवळ, सार्वजनिक ठिकाणी आणि उघड्या जागांवर अनधिकृत फ्लेक्स व बॅनरची अक्षरशः झुंबड उडाली आहे. वाढदिवस, सण, शुभेच्छा, उद्घाटन किंवा राजकीय प्रचार — कुठल्याही निमित्ताने हे फ्लेक्स लावले जात आहेत. अनेक ठिकाणी हे बॅनर इतक्या धोकादायक पद्धतीने बसवलेले आहेत की नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे.
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी यावर तातडीने कारवाईचे आदेश देत सर्व क्षेत्रीय कार्यालयांना कठोर निर्देश दिले. त्यानुसार तीनही अतिरिक्त आयुक्त रस्त्यावर उतरले, मोहीम सुरू झाली, आणि कारवाईचा डंका वाजला. पण नागरिकांनी प्रश्न विचारला आहे — “ही कारवाई नक्की कुणावर चालली आहे?”
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 27 जणांवर गुन्हे दाखल झाले असून, 71 जणांविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल आहेत. परंतु, या यादीत एकाही राजकीय नेत्याचे नाव नाही! म्हणजेच “राजकीय फ्लेक्सबाजांना अभय, व्यावसायिकांना शिक्षा” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आगामी महापालिका निवडणुका आणि दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजकीय इच्छुकांकडून फ्लेक्सबाजीचा पूर आला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने राजकीय पोस्टरबाजांविरुद्ध कारवाई करण्याचे धाडस दाखवलेले नाही.
नागरिक आता संतप्त असून म्हणतात,
“महापालिका जर राजकीय फ्लेक्सबाजीवर गप्प राहणार असेल, तर शहर कधीच फ्लेक्समुक्त होणार नाही. एकीकडे व्यावसायिकांवर दंड, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांना अभय – हीच का पालिकेची समानतेची व्याख्या?”
नगरसेवक आणि राजकीय इच्छुकांचे बॅनर शहराच्या सौंदर्याला गालबोट लावत असताना, पालिका त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अखेरीस नागरिकांचा सवाल एकच – “फ्लेक्स काढणार कोण, की राजकारणाचाच फ्लेक्स लावला आहे?”