पुणे: आझम कॅम्पससमोर कचऱ्याचा डोंगर, प्रशासन झोपेतच!

पुणे : स्वच्छ भारताचा नारा मोठ्या थाटामाटात देणारे नेते आणि प्रशासन प्रत्यक्ष कृतीत मात्र कोसळलेले दिसत आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील आझम कॅम्पस पास गेट नंबर-2 समोर अनेक दिवसांपासून कचऱ्याचा ढीग पडलेला असून, दुर्गंधीमुळे नागरिकांचे नाक मुरडले जात आहे.


दररोज हजारो शाळकरी विद्यार्थी, कॉलेजची मुले आणि रिक्षा-चारचाकी वाहनचालक या मार्गाने ये-जा करतात. मात्र त्यांच्या आरोग्याची कोणालाच पर्वा नसल्याचे चित्र आहे. कचऱ्याच्या ढिगामुळे आजार पसरू शकतात, पण प्रशासन मात्र ‘झोपेच्या गर्तेत’ गेलेले आहे.
स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक आणि कॉर्पोरेटर हे सर्वजण जनतेच्या समस्या ऐकण्याऐवजी निवांतपणे ‘गाढ झोप’ घेत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. छावणी परिषद असो वा महापालिका — दोघांच्याही गाड्या इथे फिरकल्या नाहीत, हे नागरिकांना पोटतिडकीने सांगावे लागतेय.
“फोटो समोर आहेत, कचऱ्याचा दुर्गंध सगळ्यांना त्रास देतोय, तरी कुणाचे लक्ष नाही. मग जनता प्रशासनाकडून नेमकी काय अपेक्षा ठेवायची?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.