पुणे: दंडाची पावती की गुन्हेगारांची मस्ती? ट्रिपल सीटवरून थेट पोलिसांवर हल्ला; कायद्याची भीती कुठे गेली?
पुणे, दि. १ (प्रतिनिधी) –
शहरात वाहतूक नियम पाळणाऱ्यांची संख्या कमी होत असतानाच, नियम सांगणाऱ्या पोलिसांवरच हात उचलण्याची ‘नवी परंपरा’ धायरी फाटा चौकात पाहायला मिळाली. ट्रिपल सीटवरून दुचाकी हाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांना दंड भरावा लागेल, ही बाब इतकी जाचक ठरली की त्यांनी थेट वाहतूक पोलिस हवालदारावरच मारहाण करण्याचा मार्ग स्वीकारला.
सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतूक नियमांचे पालन करून आपले कर्तव्य बजावणाऱ्या संदेश सेंगर या हवालदाराला “दंड कसा काय करतोस?” या प्रश्नाचे उत्तर चापट, शिवीगाळ आणि गणवेश फाडून देण्यात आले.
एकाच दुचाकीवर तिघे बसून नियम मोडणे हे काहींना ‘हक्काचे स्वातंत्र्य’ वाटत असावे. त्यात दंडात्मक कारवाई म्हणजे जणू गुन्हेगारांच्या स्वाभिमानावर घाला! त्यामुळे वाद, आरडाओरड आणि थेट मारहाण असा कायद्याच्या रक्षकांचा ‘सन्मान’ करण्यात आला.
या प्रकरणी लकी गौरव आनंद, साहिल प्रकाश चिकणे आणि श्रावण रमेश हिरवे यांना अटक करण्यात आली असून, कायद्याशी याआधीही सख्य असल्याची माहिती समोर आली आहे. चौथा साथीदार मात्र अद्याप फरार आहे—कायद्याला चकवा देण्याची परंपरा तोही पुढे नेत असल्याचे दिसते.
प्रश्न असा आहे की,
➡️ वाहतूक नियम पाळणे गुन्हा ठरतोय का?
➡️ पोलीस गणवेशावर हात टाकण्याचे धाडस कुठून येते?
➡️ सराईत गुन्हेगार रस्त्यावर मोकाट फिरत असतील, तर सामान्य नागरिक सुरक्षित आहे का?
शासकीय कामात अडथळा आणणे आणि पोलिसावर हल्ला करणे हा गंभीर गुन्हा असतानाही अशा घटना वारंवार घडत असतील, तर कायद्याचा दरारा केवळ कागदावरच उरला आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
—