पुणे: ससून रुग्णालयातील ४.१८ कोटींचा घोटाळा उघड, २५ जणांवर गुन्हा दाखल, वाचा काय आहे प्रकरण ?

n62335981417217506249507bdc544664ee49fb4ae949a5b297113fd02bde6a93fb232fdd25eccc5902a16d.jpg

पुणे: ससून सर्वोपचार रुग्णालयात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. रुग्णालयाच्या तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यासह १६ कर्मचाऱ्यांनी मिळून ४ कोटी १८ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने चौकशी करून अहवाल सादर केला होता. अहवालाच्या आधारे रुग्णालय प्रशासनाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोषी आढळलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार म्हणून ससून रुग्णालयातील तत्कालीन प्रशासकीय अधिकारी अनिल माने याचे नाव पुढे आले आहे. मानेसह २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रुग्णालयातील रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार, कक्षसेवक नीलेश शिंदे, अधिपरिचारिका सुमन वालकोळी आणि इतर १२ कर्मचारी तसेच काही खासगी व्यक्तींचा समावेश आहे.

या गैरव्यवहारात रुग्णालयाच्या प्रशासकीय खात्यातील ४ कोटी १८ लाख रुपये विविध खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांनी हे पैसे पुन्हा एकाच खात्यात जमा करून अपहार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांमध्ये काही जण बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत होते.

गैरव्यवहाराचा तपशील:

कालावधी: जुलै २०२३ ते जानेवारी २०२४

गुन्हा उघडकीस: जुलै २०२४

समिती स्थापना: ऑगस्ट २०२४

कारवाई: सप्टेंबर २०२४

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग?

गैरव्यवहार उघड झाल्यानंतर, वरिष्ठांचा सहभाग असल्याच्या शक्यतेने तपासाचा रोख वाढला आहे. गैरव्यवहाराच्या काळात ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. संजीव ठाकूर आणि डॉ. विनायक काळे होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचीही चौकशी होण्याची मागणी होत आहे.

– ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय खात्याचे लेखापरीक्षण सुरू आहे, असे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी सांगितले.

Spread the love