पुणे शहरात रात्री दीड वाजल्यानंतर पब-बार सुरू राहिल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई

पुणे: शहरातील पब आणि बार रात्री दीड वाजल्यानंतरही सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना थेट जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. शहरात पब आणि हॉटेल व्यावसायिकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने टवाळखोरांचे फावले आहे, असे पोलिस आयुक्तांनी नमूद केले.
पुणे शहरात रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत अनेक आस्थापना बेकायदेशीरपणे सुरू ठेवल्या जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हॉटेल आणि पब व्यावसायिकांची वाढती मुजोरी रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांनी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. “नियमांचे उल्लंघन थांबले नाही, तर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांवर गंभीर कारवाई केली जाईल,” असे आयुक्त अमितेश कुमार यांनी ठणकावून सांगितले.
या गंभीर समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या गस्ती वाढवण्याचे आणि नियमांचे काटेकोर पालन करवून घेण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील नागरिकांनीही याबाबत तक्रारी नोंदवण्याचे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.