पुण्यात अनधिकृत शाळांचा सुळसुळाट; १२ अनधिकृत शाळांची यादी जाहीर; अनधिकृत शाळांवर दररोज ₹१०,००० दंड; शिक्षण विभागाची कारवाई सुरू

illegal-school_202205824748.jpg

पुणे: जिल्ह्यात अनधिकृत शाळांच्या वाढत्या संख्येमुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भवितव्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात १२ शाळा अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले असून, या शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना खासगी इंग्रजी माध्यम शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मात्र, शाळा अधिकृत आहे की नाही, याबाबत पालक पुरेशी माहिती घेत नाहीत. यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. अनधिकृत शाळांवर कारवाई झाल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबण्याचा धोका निर्माण होतो.

पालकांनी घ्यावी अधिकृत शाळेची खात्री
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले की, “पालकांनी प्रवेश घेताना शाळा अधिकृत आहे की नाही, याची खातरजमा करणे अत्यंत आवश्यक आहे. मान्यता, यु-डायस क्रमांक, स्वमान्यता यांसारख्या गोष्टी तपासूनच प्रवेश घ्यावा.”

अनधिकृत शाळांवर कडक कारवाईचा इशारा
अनधिकृत शाळा तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर कोणत्याही संस्थेने अशा शाळा सुरू ठेवल्या, तर दररोज ₹१०,००० दंड वसूल केला जाईल, तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नाईकडे यांनी स्पष्ट केले.

अनधिकृत शाळांची यादी जाहीर
शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यादीमध्ये पुढील शाळांचा समावेश आहे:

1. श्रीनाथ इंग्लिश मीडिअम स्कूल, वीर, पुरंदर


2. जिजस क्राईस्ट इंग्लिश मीडिअम स्कूल, कामशेत


3. किंग्ज वे पब्लिक स्कूल, लोणावळा


4. शिव समर्थ इंग्लिश मीडिअम स्कूल, जांभुळवाडी


5. एंजल इंग्लिश मीडिअम हायस्कूल, गणेश नगर


6. चाणक्य ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट


7. अंकुर इंग्लिश मीडिअम स्कूल, मारुंजी


8. पेरिविंकल इंग्लिश मीडिअम स्कूल, पिरंगुट


9. इलाईट इंटरनॅशनल स्कूल, कासारआंबोली


10. संस्कार प्रायमरी इंग्लिश मीडिअम स्कूल, पिरंगुट


11. दिल्ली पब्लिक स्कूल, हिंजवडी


12. मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मांजरी

पालकांसाठी मार्गदर्शन कक्ष
हवेली, मुळशीसह पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भागातील पालकांसाठी मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. याठिकाणी शाळांच्या मान्यतेसंदर्भात माहिती उपलब्ध करून दिली जाईल, असे शिक्षण विभागाने सांगितले.

पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन
शिक्षण विभागाने पालकांना अपील केले आहे की, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अधिकृत शाळांचीच निवड करावी. अन्यथा, शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो.

Spread the love