पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट महापालिकेत विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
पुणे: पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पुणे महापालिकेत विलीनीकरण करण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. दक्षिण कमांड, पुणे महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकार्यांची उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विलीनीकरणासंदर्भातील सात प्रमुख मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली असून, या चर्चेचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे.
विलीनीकरणाच्या सात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
या बैठकीत कॅन्टोन्मेंट बोर्डाकडील जमिनींचे हस्तांतरण, कर्मचारी वर्गाचे व्यवस्थापन, रस्ते आणि दळणवळण सुविधा, नागरी सुविधा, मालमत्ता आणि हिशेब, तसेच कागदपत्रे आणि दस्तावेज यांसारख्या सात मुद्द्यांवर चर्चा झाली. दक्षिण कमांडच्या अधिकार्यांनी नागरी वस्ती आणि नागरिकांना प्रवेश असलेल्या भागाचा ताबा महापालिकेकडे वर्ग करण्याची तयारी दर्शवली.
कर्मचारी वर्गाच्या व्यवस्थापनावर चर्चा
कर्मचाऱ्यांना महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात चर्चा झाली. बोर्डाच्या सेवेत राहणे किंवा महापालिकेत जाण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सेवा-सुविधांची निश्चिती
महापालिकेत विलीनीकरण झाल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाला सेवा-सुविधा कशा पद्धतीने पुरवायच्या, यावरही चर्चा करण्यात आली. यासाठी कार्यक्षम आणि सुसज्ज व्यवस्था उभी करण्यावर भर देण्यात आला आहे.
उच्चस्तरीय बैठकीत अधिकारी उपस्थित
या बैठकीस दक्षिण कमांडचे सहसंचालक राजेंद्र जगताप, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रोतो पॉल, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मिनाक्षी लोहिया यांसह लष्कराचे अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाकडे अहवाल पाठविला जाणार
बैठकीतील चर्चेचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येत असून तो लवकरच राज्य शासनाला सादर केला जाईल. त्यानंतर पुढील निर्णय आणि कार्यवाहीची प्रक्रिया सुरू होईल. केंद्र शासनाने देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार पुण्यातील ही प्रक्रिया राबविली जात आहे.
—