पुण्यात पोलिसांची ‘दिवाळी वसुली’; फटाका विक्रेत्यांकडून हजारो रुपये उकळल्याचा आरोप
पुणे: दिवाळीनिमित्त फटाका विक्री व साठ्याबाबत अधिकृत परवानगी घेण्याचे आदेश पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर केले होते. परिपत्रकाद्वारे अधिकृत परवाना शुल्क 600 रुपये असून, हे शुल्क पोलीस उपायुक्त कार्यालयात जमा करावे, अशी सूचनाही त्यांनी दिली होती. त्यामुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला होता.
मात्र, पुण्याच्या पूर्व भागात पोलिसांकडून फटाका विक्रेत्यांकडून 5 ते 10 हजार रुपये वसुल केल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशालाच पोलिसांनी पायाखाली तुडवले असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत 39 पोलीस ठाण्यांमध्ये 4,000 हून अधिक फटाका स्टॉल आहेत. एका स्टॉलकडून 10 हजार रुपये प्रमाणे वसुली केल्यास सुमारे 4 कोटींची रोकड जमा होणार आहे. नागरिकांनी याविषयी आश्चर्य व्यक्त करत विचारले की, अधिकृत शुल्काव्यतिरिक्त एवढी रक्कम गोळा करण्यामागे काय उद्देश आहे?
पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही ‘पठाणी वसुली’ चालू केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. अनेक ठिकाणी फटाका विक्रेत्यांकडून ठरावीक रक्कम घेतली जात आहे, आणि विक्रेत्यांना या प्रकाराचा फटका बसत आहे. परिणामी, विक्रेते आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण होत असून, विक्रेत्यांना आर्थिक नुकसान होत आहे.
पैसा कोणाच्या खिशात? विक्रेत्यांना अधिकृत परवानगी मिळूनही पोलिसांकडून गैरप्रकार सुरू आहेत. या वसुलीचा फायदा कोणाला होत आहे? गोळा केलेली रक्कम कुठे जात आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.
कारवाईची अपेक्षा पोलिसांच्या या कारवायांवर नागरिकांकडून तीव्र टीका होत आहे. आदेश पाळूनही विक्रेत्यांना पैसे देण्याची सक्ती का केली जात आहे? ज्यांनी अनधिकृत वसुलीचा आदेश दिला आहे, त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
विक्रेत्यांचे आर्थिक संकट दिवाळीचा आनंद मिळवण्यासाठी फटाका स्टॉल लावणाऱ्या विक्रेत्यांना पोलिसांच्या अवास्तव मागण्यांमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियम पूर्ण करून, वैध प्रमाणपत्रे मिळवूनही त्यांच्यावर आर्थिक भार पडत आहे, ज्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर होत आहे.