पुणे : शिरुर पोलिसांना चोराचे आव्हान; पोलिसाचीच चारचाकी गाडी चोरीला, पोलिसांच्या गाड्या सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय.?

पुणे : शिरुर शहरातील बाबुरावनगर येथे पोलीस कर्मचारी योगेश आनंदा गुंड यांची मारुती सुझुकी इर्टिगा गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरली आहे. पोलिसांच्याच गाड्या सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल आता शिरुर शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत.
**घटनेची सविस्तर माहिती:**
ऑगस्ट २५ रोजी पहाटे ३:५८ वाजता बाबुरावनगर येथील महेंद्र हाइट्स बिल्डिंगच्या बाजुला पार्क केलेली योगेश गुंड यांची मारुती सुझुकी इर्टिगा (गाडी क्रमांक MH12TD 0702) दोन अज्ञात व्यक्तींनी स्विफ्ट डिझायर कार मधून येत गाडीचे लॉक तोडून चोरी केली. या घटनेची तक्रार शिरुर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार जगताप करत आहेत.
**शिरुर पोलिसांसमोर आव्हान:**
शिरुर शहरात पोलिसाचीच गाडी चोरीला गेल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शहरातील गुन्हेगारी वाढल्याने नागरिकांतून असुरक्षिततेची भावना वाढत आहे. शिरुर पोलीस स्टेशनची हद्द मोठी असून, टाकळी हाजी येथे स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे पोलीस बांधवांवर कामाचा ताण असून, याचा परिणाम शहरातील आणि ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी या मुद्द्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.