नवीन अभ्यासक्रम मसुदा जाहीर : तिसऱ्या भाषेची सक्ती रद्द, नव्या विषयांचा समावेश

पुणे, २९ जुलै – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते दहावीसाठी शालेय शिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम मसुदा तयार केला असून, यामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती रद्द करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी)ने तयार केलेला हा मसुदा २८ जुलैपासून www.maa.ac.in २०२५ या संकेतस्थळावर नागरिकांसाठी अभिप्रायासाठी खुला करण्यात आला आहे.
शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल
नवीन मसुद्यानुसार, शालेय अभ्यासक्रमात आता मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तसेच कलाशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि पायाभूत मूल्य शिक्षण हे विषय असतील. यामध्ये इयत्ता सहावीनंतर व्यावसायिक शिक्षणाचे स्वतंत्र विषय असणार आहेत.
इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी यापूर्वी अस्तित्वात असलेला ‘परिसर अभ्यास’ हा विषय आता ‘आपल्या सभोवतालचे जग’ या नावाने भाग १ आणि भाग २ अशा स्वरूपात मांडण्यात येणार आहे. इयत्ता तिसरीसाठी जिल्हा, चौथीसाठी राज्य आणि पाचवीसाठी देश या स्तरांनुसार अभ्यासक्रम रचण्यात आला आहे.
शिवछत्रपतीचा समावेश कायम
चौथी इयत्तेतील ‘शिवछत्रपती’ हे विद्यमान पाठ्यपुस्तक जैसे आहे तसेच राहणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष वैशिष्ट्ये : नवकल्पना आणि कौशल्य विकासावर भर
नववी-दहावीच्या अभ्यासक्रमात आंतरविद्याशाखीय शिक्षण, पर्यावरण शिक्षण, भारतीय ज्ञान प्रणाली, राज्यघटनात्मक मूल्ये, शाश्वत विकास, सामाजिक समावेशन आणि उद्योजकता कौशल्य यांचा समावेश करण्यात आला आहे.
अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार असून, त्याच आधारे राज्य मंडळाचा अभ्यासक्रम ठरेल.
त्रिभाषा सूत्राबाबत निर्णय लवकरच
तिसऱ्या भाषेची सक्ती रद्द केल्यानंतर त्रिभाषा धोरणाबाबत सध्या डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती शिफारसीवर विचार सुरू आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत सध्याची अभ्यासक्रम पद्धती सुरूच राहणार आहे. मराठी भाषेचा अभ्यासक्रम अंतिम झाल्यानंतर इतर भारतीय भाषांचे अभ्यासक्रम त्यानुसार सुधारले जातील.