पुणे पोलिसांची नवी संकल्पना; पीडितांना समुपदेशन आणि कायदेशीर मदत एकाच ठिकाणी; १५० महिला वकिलांची नियुक्ती, गुन्हेगारीच्या विरोधात ‘अहिल्या सेल’ चा दणका

पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गुन्हेगारी नियंत्रणासाठी आणि पीडितांना मदतीसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील ९५ पोलीस ठाण्यांमध्ये ‘अहिल्या सेल’ उपक्रमाची संपूर्ण अंमलबजावणी करण्यात आली असून, या माध्यमातून महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत कायदेशीर मदत मिळणार आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून १५० प्रशिक्षित महिला वकिलांची नियुक्ती करण्यात आली असून, त्या प्रो-बोनो आधारावर (मोफत) न्यायालयीन मदत आणि सल्ला देतील. मागील वर्षी ८ मार्च २०२४ रोजी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेला ‘अहिल्या सेल’ आता पूर्ण वेळ कार्यरत राहणार आहे.
पीडितांना त्वरित मदतीसाठी अहिल्या सेल प्रभावी
या उपक्रमामुळे एफआयआरची त्वरित नोंदणी, वैद्यकीय उपचारांसाठी मदत, प्रक्रियात्मक मंजुरी जलद करणे आणि मानसिक सल्ला या गोष्टी प्रभावीपणे राबवल्या जातील. तसेच, संकटात सापडलेल्या महिलांना सरकारी योजनांबाबत माहिती आणि आर्थिक मदत मिळेल.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गुन्हेगारीवर आळा बसणार असून, नागरिकांना त्वरित न्याय मिळेल. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने हा उपक्रम पुढे नेण्यात येत आहे.
शहरातील नागरिक आणि विशेषतः पीडितांसाठी हा उपक्रम मोठी दिलासादायक बाब ठरणार असून, पुणे पोलिसांकडून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.