मुंबई: मोनोरेल थांबली, काच फोडून प्रवाशांची सुटका – व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह! थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

0
IMG_20250819_211608.jpg

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी म्हणवणाऱ्या मुंबईत मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा ‘व्यवस्थे’चे पितळ उघडे पडले आहे. भक्ती पार्क आणि म्हैसूर कॉलनीदरम्यान उंच पुलावर मोनोरेल अचानक थांबली आणि शेकडो प्रवासी तासन्तास अडकून पडले. अखेर काच फोडून व क्रेनच्या मदतीने सुटका करण्यात आली. थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असला तरी ही घटना प्रवासी सुरक्षेवरील मोठा प्रश्नचिन्ह ठरली आहे.

तांत्रिक कारण आणि वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोनोरेल बंद पडल्याचे MMMOCL ने मान्य केले आहे. मात्र पावसाळ्यात अशा घटनांची वारंवार पुनरावृत्ती होत असल्याने केवळ निवेदनावर जबाबदारी झटकणे योग्य ठरेल का, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रवासी हात जोडून सुटकेची याचना करताना दिसले, एक जण बेशुद्ध पडल्याचेही समोर आले. ही अवस्था आधुनिक वाहतुकीच्या नावाखाली होत असेल तर प्रवासी सुरक्षित आहेत का?

पहा व्हिडिओ

सौजन्य साम टीव्ही

मुंबईच्या जनजीवनावर पावसाचा तडाखा आधीच बसला आहे. रेल्वे सेवा विस्कळीत, रस्ते जलमय, घरांमध्ये पाणी… अशात मोनोरेल सारख्या उंचावर धावणाऱ्या वाहतुकीची काडीमात्रही हमी नसेल तर ही सेवा कोणाच्या भल्यासाठी? लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पाचा शेवट अशा घटनांमध्ये प्रवाशांचे प्राण धोक्यात घालण्यातच होतो आहे.

राज्याचे मुख्यमंत्री विक्रमी ३०० मिमी पावसाची माहिती देतात, मृत्यूंची आकडेवारी सांगतात, पण मुंबईच्या पायाभूत सुविधांची दुरवस्था थांबवण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली जात आहेत, याचे उत्तर मात्र नाही. मोनोरेल बंद पडणे हा केवळ तांत्रिक बिघाड आहे की व्यवस्थापनातील बेपर्वाई, याची चौकशी होणे गरजेचे आहे. अन्यथा उद्या अशाच अपघातात एखाद्याचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?

मुंबईकरांसाठी हा अनुभव फक्त धक्कादायक नाही, तर भविष्यातील धोक्याची घंटा आहे. आता तरी प्रशासनाने निवेदनांपलीकडे जाऊन ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, नाहीतर मोनोरेल हा प्रवासी सुखाचा नाही तर भीतीचा प्रवास ठरेल.


Spread the love

Leave a Reply