सोलापूर जिल्ह्यात चमकली कु. विबोधी यादव – पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल

अक्कलकोट, दुधनी | प्रतिनिधी
मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशालेतील विद्यार्थिनी व बालकलाकार कु. विबोधी यादव हिने इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत सोलापूर जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. सन 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत तिच्या यशाने संपूर्ण परिसरात आनंदाची लाट पसरली आहे.
विबोधी ही केवळ अभ्यासातच नव्हे, तर सांस्कृतिक क्षेत्रातही अतिशय सक्रिय आहे. तिने भरतनाट्यम, वाद्यवृंद, हार्मोनियम वादन, गायन तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक विषयांवर वकृत्व करून अनेक मंच गाजवले आहेत. शालेय, तालुकास्तरावरील व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्येही तिने बहुमोल पुरस्कारांची कमाई केली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक श्री. प्रथमेश म्हेत्रे, मुख्याध्यापक श्री. सिध्दाराम पाटील आणि सर्व शिक्षकवृंदांनी विबोधीचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या प्रवासात आदर्श शिक्षक व समाजसेवक श्री. पोमू राठोड सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे विद्यालय प्रशासनाने सांगितले.
विबोधी यादव हिचे हे यश अक्कलकोट तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.