Medical Admissions 2025: कॉलेज फी न भरल्याने विद्यार्थ्याला डांबून ठेवले! सिंधुदुर्गातील धक्कादायक प्रकार, CET सेलकडून अखेर दखल

n6888717531763044970508dbdab614ab630897f62130a3722b2cb61897e27e3ce683df88d68b021bb435aa.jpg

Maharashtra MBBS Counselling 2025: सिंधूदुर्ग जिल्ह्यातील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाने एका अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची एमबीबीएस प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीदरम्यान प्रवेश शुल्कावरून अडवणूक करीत, प्रवेश नाकारला होता.

याबाबतीत संबंधित विद्यार्थ्याने सीईटी सेलकडे तक्रार करीत दाद मागितली होती. सीईटी सेल, डीएमईआर व एआरए यांच्यापर्यंतही हा प्रकार पोहचला होता. त्याची दखल घेत, अखेर सीईटी सेलने संबंधित विद्यार्थ्यास चौथ्या प्रवेश फेरीत सहभागी होण्याची संधी दिली आहे.

संबंधित विद्यार्थ्याला एमबीबीएस प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीमध्ये सिंधूदुर्ग जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. गडचिरोलीहून या प्रवेशासाठी आल्यानंतर नियमानुसार ५० हजार रुपयांचा धनादेश त्याने प्रवेशासाठी दिला. परंतु, महाविद्यालयामार्फत त्याला खानावळ आणि वसतिगृह शुल्क म्हणून धनादेशाद्वारे ८ लाख ७० हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्याने हे पैसे भरण्यात नकार दिला. त्यानंतर त्याला कार्यालयात बोलवून, ‘माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकत नाही. महाविद्यालय प्रशासनाची यामध्ये कोणतीही चूक नाही,’ अशा आशयाचा ई-मेल ‘सीईटी सेल’ला पाठविण्याची सक्ती करण्यात आली.

नेमकी घटना – कॉलेजची फी न भरल्याने गडचिरोलीच्या विद्यार्थ्याला डांबून ठेवलं! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केले. या विद्यार्थ्यानेही त्यानंतर सीईटी सेल व अन्य संबंधित अस्थापनांकडे लेखी तक्रार दाखल केली. याची दखल घेत, संबंधित प्रकरणाची दहा नोव्हेंबरला सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या निकालात, अखेर सीईटी सेलमार्फत या विद्यार्थ्याला प्रवेशाच्या चौथ्या फेरीत सहभागी होण्याची संधी सीईटी सेलमार्फत देण्यात आली आहे. तसे संबंधित विद्यार्थ्याला ई-मेलद्वारे कळविण्यात आले.

MAHA TET 2025: टीईटी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट! परीक्षा दिनांक आणि हॉलतिकीट जाहीर; डाउनलोड लिंक बातमीत

महाविद्यालय कारवाईपासून दूर –
संबंधित विद्यार्थ्याला आता चौथ्या फेरीत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयांचे पर्याय दाखल करावे लागणार आहेत. सीईटी सेलमार्फत विद्यार्थ्याला संधी देण्यात आलेली असली, तरी त्याची अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयावर कारवाई केली की नाही, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

Spread the love