पिंपरी-चिंचवडमध्ये रेशन धान्याची लूट?
छावा मराठा युवा महासंघाचा इशारा – दोषी दुकानदारांचे परवाने रद्द करा!
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये रेशन कार्डधारकांना मिळणाऱ्या धान्यात होत असलेल्या कपातीविरोधात छावा मराठा युवा महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषी दुकानदारांचे परवाने तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. वारंवार तक्रारी करूनही अन्न व पुरवठा विभागाकडून ठोस कारवाई न झाल्याचा आरोपही संघटनेकडून करण्यात आला आहे.
५ किलोच्या जागी कमी धान्य; कार्डधारकांची लूट सुरू?
नियमाप्रमाणे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस प्रतिमाह ५ किलो धान्य देण्यात यावे लागते. मात्र, शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकानांमध्ये कार्डधारकांकडून बायोमेट्रिक थम्ब घेतल्यानंतरही कमी धान्य दिले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
यासंदर्भात अ परिमंडळाचे पुरवठा अधिकारी विजयकुमार क्षीरसागर आणि ज परिमंडळाचे अधिकारी प्रदीप डंगारे यांना संघटनेकडून निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना संघटनेचे प्रमुख धनाजी येळकर
पाटील, प्रदेश पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष महेंद्र, कार्याध्यक्ष राजेश गुंड, प्रदेश उपाध्यक्ष गोरख शिंदे आदी उपस्थित होते.
ई-पॉस पावती न देण्याचा प्रकार; नागरिकांना जाब विचारता येत नाही
धनाजी येळकर पाटील म्हणाले की, ई-पॉस मशीनवर थम्ब घेतल्यानंतर कार्डधारकांना पावती देणे बंधनकारक आहे.
“काहीच दुकानदार पावती देतात, इतर मात्र पावती देत नाहीत. त्यामुळे नागरिकांना आपले धान्य कमी मिळाले तरी जाब विचारण्याचा अधिकारच राहत नाही,” असा आरोप त्यांनी केला.
पावतीची मागणी केली तर दुकानदार रेशन बंद करण्याची धमकी देतात, असा गंभीर आरोपही यात करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांची मूक संमती?
नियमापेक्षा कमी धान्य देणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होत नसल्यामुळे पुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांचीही मूक संमती असल्याचा संशय संघटनेने व्यक्त केला आहे.
छावा संघटनेचे जनजागृती अभियान सुरू
या गैरव्यवहाराविरोधात निर्णय घेत
८ डिसेंबरपासून सर्व रेशन दुकानांवर छावा मराठा युवा महासंघाची जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे.
संघटनेचे पदाधिकारी प्रत्येक दुकानावर जाऊन कार्डधारकांशी संवाद साधतील, त्यांना त्यांच्या हक्कांची माहिती देतील.
संघटनेचे म्हणणे आहे की,
“गरीब व गरजू कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही. गैरव्यवहार थांबवला नाही तर आंदोलन उभारले जाईल.”
—
पिंपरी-चिंचवडमधील या धान्य वितरणातील गोंधळामुळे हजारो कार्डधारकांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, छावा संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासन कोणती कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.