येवलेवाडीतील ‘लॉजिंग’ की ‘लोडिंग सेंटर’? कोंढव्यात अनैतिक धंद्याचा पर्दाफाश
पुणे : हॉटेल साई बालाजी लॉजिंग… नाव ऐकून भक्तीभाव जागा होतो, पण प्रत्यक्षात मात्र येवलेवाडीतील या लॉजवर “बालाजी”पेक्षा वेगळ्याच सेवेचा प्रसाद वाटला जात होता! अखेर कोंढवा पोलिसांनी धाड टाकत या तथाकथित लॉजिंगमधील अनैतिक कारभार उघडकीस आणला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी “अवैध धंद्यांवर कारवाई करा” असे आदेश दिल्यानंतर कोंढवा पोलिस गस्तीत असतानाच पोलिस हवालदार अमोल हिरवे यांना साक्षात्कार झाला. माहिती खात्री करण्यासाठी पोलिसांनी थेट बनावट ग्राहक पाठवला आणि लॉजमधील “सेवा-सूची” स्पष्ट झाली.
धाड टाकताच दोन महिलांची सुटका करण्यात आली, तर लॉजचा मालक रवी छोटे गौडा (वय ४६) आणि त्याचा “ऑलराउंडर कामगार” सचिन प्रकाश काळे (वय ४०) यांना बेडरूममधून थेट पोलीस स्टेशनची वाट दाखवण्यात आली.
लॉज मालक आणि कामगार अशी जोडी पाहता, येथे कामगार फक्त चादरी बदलत नव्हता, हे पोलिसांनाही लक्षात आले!
या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “लॉजिंग”च्या नावाखाली काय काय लोडिंग सुरू होते, याचा आता तपास सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अफरोज पठाण, अमोल हिरवे, स्वागत पळसे व त्यांच्या पथकाने केली.
दरम्यान, येवलेवाडी परिसरात “लॉज म्हणजे निवास की व्यवसाय?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, अशा लॉजेसवर नियमित लक्ष ठेवणार का? असा टोमणाही पोलिस यंत्रणेला मारला जात आहे.
एकूण काय,
देवाच्या नावाने चालणाऱ्या लॉजमध्ये ‘देवदर्शन’ नाही तर ‘वेगळेच दर्शन’ सुरू होते, आणि अखेर पोलिसांनी आरती ओवाळली!