महापालिकेच्या शाळेत दारूच्या बाटल्या, अस्वच्छता; आम आदमी पार्टीने घेतली महापालिकेची शाळा दुरुस्तीची जबाबदारी – व्हिडिओ
पुणे: बोपोडी येथील श्री सर्वपल्ली राधाकृष्णन मनपा शाळेच्या आवारात अस्वच्छतेचे आणि सुरक्षेच्या अभावाचे धक्कादायक चित्र उघड झाले आहे. शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्या, चकण्याची पाकिटे आणि गवताचे मोठे झुडूप आढळून आले. या दुरवस्थेचा एक व्हिडीओ आम आदमी पार्टीने शेअर करत महापालिकेच्या शाळांचे दुर्लक्ष चव्हाट्यावर आणले आहे.
आम आदमी पार्टीच्या पुणे शहर शाखेचे अध्यक्ष सुदर्शन जगदाळे आणि महिला उपाध्यक्षा अँन अनिश यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या शाळेत भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रवक्ते मुकुंद किर्दत, महासचिव सतीश यादव, संघटन सहमंत्री विकास चव्हाण आणि इतर सदस्यांनी देखील शाळेतील समस्या उघड केल्या. कार्यकर्त्यांनी शाळेच्या आवारातील अस्वच्छतेकडे लक्ष वेधत, शाळेत स्वच्छता आणि सुरक्षा यांची संपूर्णत: वानवा असल्याचे सांगितले.
पहा व्हिडिओ
शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, टॉयलेटमध्ये पाणी नाही, मच्छर नियंत्रणासाठी फवारणी होत नाही, आणि रात्री मद्यपी शाळेत येऊन मद्यपान करतात, अशी माहिती मिळाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक यांनी महापालिकेकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला असतानाही कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी तक्रार कार्यकर्त्यांनी केली आहे.
आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे की, पुणे महापालिकेचे हे अक्षम्य दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला गंभीरपणे धोक्यात आणणारे आहे. जोपर्यंत या समस्या सोडवण्यात येत नाहीत, तोपर्यंत पार्टीचे कार्यकर्ते शाळेत येऊन आवश्यक ती कामे करून घेतील, असे त्यांनी जाहीर केले आहे.
महापालिकेच्या शाळांची स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी करण्यात येत आहे.