पुण्यात १८०० कोटींची जमीन फक्त ३०० कोटींना विक्री; तहसीलदार व दुय्यम निबंधक निलंबित

0
IMG_20251106_162054.jpg

पुणे – तब्बल १८०० कोटी रुपयांची सरकारी जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून, विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

या वादग्रस्त व्यवहारात मोठ्या अनियमिततेचा संशय व्यक्त करण्यात येत असून, विशेष म्हणजे या व्यवहारासाठी फक्त ५०० रुपयांचीच स्टँप ड्युटी आकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले.

त्याअनुषंगाने पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यानंतर दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांनाही निलंबनाची झळ बसली आहे. या दोघांवर जमीन नोंदणी प्रक्रियेत गंभीर अनियमितता व बेकायदेशीर नोंदणीचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करत “व्यवहारात कुठेही गैरप्रकार झाला असेल तर निश्चितच कारवाई झाली पाहिजे,” असे स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे नाव यापूर्वीही चर्चेत आले होते. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात वाळू माफियांशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर २७ ऑगस्ट २०२३ रोजी महसूल खात्याने कारवाई केली होती.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील या नव्या जमीन व्यवहाराने प्रशासनात खळबळ माजली असून, आता अजित पवार आणि पार्थ पवार या दोघांची भूमिकाही राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed