पुण्यात शाळा-महाविद्यालयांमध्ये गुन्हेगारी वाढ, लैंगिक शोषणाच्या घटनांना आळा घालण्यासाठी आरटीओ प्रशासन अॅक्शन मोडमध्ये, आता महाविद्यालयांच्या वाहनांची करावी लागणार नोंदणी ऑनलाईन
पुणे: शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गुन्हेगारीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. लैंगिक शोषण आणि विनयभंगाच्या घटनांनी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मागील महिन्यात एका अल्पवयीन मुलीवर स्कूल व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली होती. तसेच, एका महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक शोषण झाल्याची दुसरी घटना समोर आली होती.
अशा घटनांना आळा घालण्यासाठी पुणे आरटीओ प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना त्यांच्या स्कूल व्हॅन आणि बसची माहिती आरटीओच्या अधिकृत वेबसाईटवर येत्या १५ दिवसांत भरावी लागणार आहे. या आदेशाचे पालन न केल्यास शिक्षण विभागाकडून कठोर कारवाईची नोटीस बजावली जाईल, अशी माहिती पुणे आरटीओ आणि शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.