पुण्यात ७६ खासगी नियम न पाळणाऱ्यांना रुग्णालयांना महापालिकेची नोटीस; सुधारणेला एक महिन्याची मुदत; अन्यथा कडक कारवाई; १५ पथकांकडून शहरभर तपासणी सुरू

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांची मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम हाती घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७६ रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. आतापर्यंत शहरातील ७१४ खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली असून, यात काही रुग्णालयांनी आवश्यक निकष पूर्ण न केल्याचे आढळले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार नोंदणी, डॉक्टर व परिचारिकांची संख्या, दरपत्रक प्रदर्शित करणे, अग्निशमन परवानगी आणि जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत तपासणी केली. यात अनेक रुग्णालयांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आले.
आरोग्य विभागाचे सहायक अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमभंग करणाऱ्या रुग्णालयांना सुधारण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. काही रुग्णालयांनी सुधारणा केल्याची माहिती दिली असून, उर्वरित संस्थांची तपासणी महापालिकेकडून करण्यात येणार आहे. सुधारणा न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
तपासणी मोहिमेचा आढावा
एकूण खासगी रुग्णालये: ८४९
तपासणी झालेली रुग्णालये: ७१४
नियमभंग करणाऱ्या रुग्णालयांना नोटीस: ७६
महापालिकेने सुरू केलेल्या या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्वच प्रकारच्या रुग्णालयांची तपासणी केली जात आहे. यात ॲलोपथी, आयुर्वेद, युनानी, नॅचरोपथी आदी शाखांतील रुग्णालये समाविष्ट आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांत तीन जणांचे पथक गठीत करून तपासणी सुरू आहे.
महापालिकेच्या या कारवाईमुळे खासगी रुग्णालयांमध्ये आवश्यक सुधारणा होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.