IMD चा अंदाज खरा ठरला, पण PMC मात्र गाफील; गुंजन चौकात पावसात ड्रेनेज तुंबले, रस्ते जलमय; प्रशासन झोपेतच – व्हिडिओ

0
IMG_20250520_225253.jpg

महाराष्ट्र माझा प्रतिनिधी, पुणे
येरवड्यात मंगळवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, उष्णतेच्या लाटेने त्रस्त पुणेकरांना वादळी वाऱ्यांसह काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, या पावसाने शहरातील रस्त्यांची जी दयनीय अवस्था केली आहे, ती पाहता नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गुंजन चौक परिसरात रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांचा अंदाज न लागल्याने वाहने घसरून अपघात होण्याचे प्रकार घडत असून, सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पहिल्याच पावसात रस्त्यांची स्थिती उजागर झाल्याने कामाच्या निकृष्ट दर्जावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पहा व्हिडिओ

स्थानिक दुकानदार आणि नागरिकांनी महाराष्ट्र माझाशी बोलताना सांगितले की, दरवर्षी पावसाळ्यात या परिसरातील चेंबर तुंबण्याची समस्या उद्भवते. ड्रेनेज व्यवस्था आणि रस्त्यांची देखभाल याकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्यांकडे कुठलाही ठोस उपाय करण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.

“जर वेळेत उपाययोजना केली नाही, तर नगर रोड क्षेत्रीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. प्रशासनाने आमच्या तक्रारींकडे वारंवार दुर्लक्ष केल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

या विषयावर प्रतिक्रिया घेण्यासाठी महाराष्ट्र माझाच्या प्रतिनिधीने सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यामुळे प्रशासनाचा कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा संशयाचे सावट निर्माण झाले आहे.

नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने ठोस उपाययोजनांची मागणी केली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी आता महापालिकेवर आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed