“पुण्यात ‘गुड लक’ च्या नावाखाली अवैध वसुलीचा धंदा जोमात”; “अवैध धंद्यांमुळे सामान्य नागरिकांवर वाढता अन्याय”

n64348360817342653379477548b0518ec6254aa48a8f3a5392be5a284737a0bc9ae5630b697cd45f5a3f9c.jpg

पुणे: पुणे ग्रामीण पोलीस दलातील अवैध धंद्यांवरील नियंत्रणाचा बोजवारा उडाल्याने जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोलिसांमध्ये अधिकारी बदलाच्या पार्श्वभूमीवर ‘गुड लक’च्या नावाखाली अवैध वसुलीचा धंदा फोफावत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वसुली

पोलीस ठाण्यातील कलेक्टर अवैध धंदेवाल्यांकडून लाखो रुपयांची माया गोळा करत आहेत. ही रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन त्यांची मर्जी संपादन केली जात आहे. यामुळेच वरिष्ठ अधिकारी विश्वास ठेवून अशा कलेक्टरांना अवैध धंद्यांकडून वसुलीची मोकळीक देत असल्याची चर्चा आहे.

सर्वत्र अवैध धंद्यांचा जोर

शिरूर, दौंड, इंदापूर, भोर, सासवड, वेल्हे, मुळशी, खेड आणि मावळसारख्या तालुक्यांमध्ये अवैध दारू, ताडी, गांजा, मटका, गुटखा विक्रीसह देहविक्री व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. जिल्ह्यातील काही लॉजमध्ये देहविक्री व्यवसायाचा उघडपणे अड्डा जमला आहे.

वसुलीच्या नावाने चढलेले अर्थकारण

निवडणुका संपल्यानंतर जिल्ह्यात बंद असलेले अवैध धंदे पुन्हा सुरू झाले असून ‘गुड लक’च्या नावाखाली चारपट अधिक वसुली केली जात आहे. ही वसुली थांबवण्यासाठी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

अवैध धंद्यांतून गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना

अवैध धंद्यांमुळे वर्चस्ववाद सुरू असून त्यातून गुन्हेगारी वाढत आहे. सामान्य नागरिकांना या सर्व प्रकारांमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

अवैध धंद्यांमुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे या सर्व प्रकारांवर तोडगा काढण्याची जबाबदारी आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर बंदी आणि वसुली प्रकार थांबवण्यासाठी ते काय भूमिका घेणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

Spread the love

You may have missed