चाकण, आळंदी, महाळुंगे परिसरात अवैध धंद्यांची बेधडक मुसंडी; मोठे मासे अजूनही फरार

0
n66902896217502663862452f035dc0326d4a626070456cef7731a85e5446ba0618a79eedaf41459478e72e.jpg

चाकण, ता. ९ : खेड तालुक्यातील चाकण, आळंदी, महाळुंगे, राजगुरुनगर परिसरात दारू, गांजा, मटका, बेकायदा लॉजिंग आणि गॅस रिफीलिंगसारख्या अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस अधिकच बळकट होत असून, लाखो रुपयांचा काळा पैसा या माध्यमातून ओढला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या धंद्यांना काही राजकीय नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि पोलिस कर्मचाऱ्यांचाही वरदहस्त असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

औद्योगिक विकासाच्या नावाखाली वस्ती वाढल्याने या भागात अवैध व्यवसायांनीही आपली मुळे घट्ट रोवली आहेत. स्थानिक गुन्हेगार, तथाकथित समाजसेवक, राजकीय पदाधिकारी यांच्यामार्फत हे धंदे बिनधास्त सुरू आहेत. यामधून काहींना दरमहा ‘हप्ता’ देण्यात येत असल्याची कुजबूज आहे.

विधानसभेत मुद्दा गाजला, पण कारवाईचा अभाव

या गंभीर विषयाकडे लक्ष वेधत आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी थेट पोलिसांवर ताशेरे ओढत, काही राजकीय नेते व सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या तथाकथित प्रतिनिधींनाही या साखळीत सामील असल्याचा आरोप केला. “अवैध धंद्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे,” असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.

कारवाईच्या घोषणा हवेतच; बडे मासे अजूनही मोकाट

तालुक्यातील चाकण, महाळुंगे, भांबोली, कुरुळी, निघोजे आणि मोई परिसर हे अवैध धंद्यांचे हॉटस्पॉट ठरले आहेत. दरमहा लाखो रुपयांचा गोरखधंदा येथे चालतो. मात्र, आश्चर्य म्हणजे प्रशासन किंवा पोलिस यंत्रणा यावर ठोस कारवाई करताना दिसत नाही. “बडे मासे अजूनही मोकाट फिरत आहेत,” अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांची भूमिका महत्त्वाची

या साऱ्या परिस्थितीत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी स्वतः पुढाकार घेऊन ठोस पावले उचलण्याची गरज आहे. सरसकट कारवाई, अवैध धंद्यांचे नेते आणि पाठीराखे शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली, तरच तालुक्यातील गुन्हेगारीला लगाम बसेल, अशी नागरिकांची मागणी आहे.

Spread the love

Leave a Reply