Pune Police Ganeshotsav 2024 Advisory: छेड काढाल तर भर चौकात झळकणार बॅनर; गणेशोत्सव काळात छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पुणे पोलिसांची नियमावली
पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात देश-विदेशातून अनेक लोक सहभागी होण्यासाठी पुण्यात येतात. मात्र, या मोठ्या गर्दीचा फायदा घेत काही समाजकंटक मुली-महिला यांची छेडछाड करत असल्याच्या घटना घडतात.
मागील काही आठवड्यांपासून राज्यभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांची नोंद होत असताना, पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर केले आहे की, छेडछाड करणाऱ्यांचे फोटो असलेले बॅनर्स आता शहराच्या प्रमुख चौकांमध्ये लावले जाणार आहेत. अशा समाजकंटकांना अद्दल घडवण्यासाठी, पोलिस त्यांच्या फोटोंचे बॅनर्स लावण्यासोबतच त्यांची परेड देखील काढणार आहेत. गणेशोत्सवात महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.
या काळात विविध मदत केंद्रांची स्थापना करण्यात येणार असून, या केंद्रांमध्ये पोलीस ठाणे, विशेष शाखा, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी सतत कार्यरत असतील. मोबाईल चोरी तसेच महिलांचे दागिने चोरणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कारवाईसाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे, आणि त्यासाठी पोलिसांनी या विशेष उपाययोजना आखल्या आहेत.