कसे घडणार चांगले खेळाडू? चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलाची दुरवस्था; खेळाडूंमध्ये संताप
चंद्रपूर : जिल्ह्यात चांगलेच खेळाडू तयार व्हावेत, त्यांना नियमित सराव करता यावा, या उद्देशातून जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात आले. मात्र, देखभाल आणि दुरुस्तीअभावी या क्रीडा संकुलाची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे.
संकुलात पिण्याचे शुद्ध पाणी नाही. ‘सिंथेटिक ट्रॅक’वर धावण्यासाठी पोलीस भरती तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी मुला-मुली येथे येतात, मात्र पहाटेच्या सुमारास प्रकाश व्यवस्था नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. शौचालयाची अवस्था अतिशय वाईट आहे. यामुळे तातडीने सुधारणा कराव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा खेळाडू तसेच मनसेच्यावतीने देण्यात आला आहे.
क्रीडा संकुलाच्या दुरवस्थेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. गोरगरीब, शेतकरी कुटुंबातील हजारो मुलं-मुली पोलीस भरती व विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी शहरात वास्तव्याला आहे. त्यांना सरावासाठी जिल्हा क्रीडा संकुलाचाच आधार आहे. कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून येथे ‘सिंथेटिक ट्रॅक’ आणि ‘बॅडमिंटन हॉल’ उभारण्यात आले. यासाठी शासनाकडून दरवर्षी मोठा निधी प्राप्त होतो, तरीही खेळाडूंना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही. पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ, किडे आणि गढूळ पाणी साचलेले आहे. हेच पाणी खेळाडूंना प्यावे लागते. यातून रोगराई पसरण्याची भीती निर्माण आहे.
क्रीडांगणातील शौचालयांची स्वच्छता होत नाही. महिला प्रसाधनगृहाची अवस्था तर फारच बिकट आहे. काही शौचालये कुलूपबंद आहेत. मैदानावर सर्वत्र कचरा, झुडपे आणि भंगार साचलेले आहेत. ‘सिंथेटिक ट्रॅक’वर पावसाचे पाणी साचते. मैदान स्वच्छतेकडे कोणाचेही लक्ष नाही. जिल्हा क्रीडा प्रशासन स्पर्धेच्या नावाखाली वारंवार मैदान बंद ठेवते. त्यामुळे स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो मुला-मुलींना रस्त्यावर धावावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. पहाटे संकुलातील प्रकाश व्यवस्था बंद राहत असल्याने खेळाडूंना अंधारातच धावावे लागते.
आंदोलनाचा इशारा
क्रीडा संकुलाच्या दुरवस्थेवरून खेळाडू आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. मनसेचे सचिन भोयर यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी चर्चा करीत पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या मुला-मुलींसाठी संकुल खुले करून घेतले. यानंतर मनसेतर्फे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सर्व समस्या तातडीने न सोडवल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.