लाडकी बहीण योजनेतून नोव्हेंबरपर्यंत मदत, पण पुढे संकटाची शक्यता: राज ठाकरे यांची चिंता

अमरावती: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी शासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत महिलांसाठी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेतून महिलांना नोव्हेंबरपर्यंत आर्थिक मदत मिळेल, परंतु डिसेंबर-जानवारीत सरकारकडे पगारासाठीही पैसे शिल्लक राहणार नसल्याचे सांगितले. त्यांनी सरकारला उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले, महिलांना सशक्त करण्यासाठी उद्योग क्षेत्रात संधी निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत मांडले.
ठाकरे म्हणाले, “महिलांना सक्षम करायचं असेल, तर त्यांना फुकट पैसे न देता उद्योग उभारण्यासाठी मदत करायला हवी. शेतकऱ्यांनी कधी फुकट वीज मागितली नाही, तरीही सरकारने फुकट वीज देण्याचा निर्णय घेतला. अशा सवयी लावल्याने दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.”
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी
राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर असून, विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ते कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. अनेक कार्यकर्ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, मनसेमध्ये प्रवेश घेण्यासाठीही अनेकजण उत्सुक आहेत. तथापि, उमेदवारीसंदर्भात कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सरकारवर टीका
माध्यमांशी अनोपचारिक संवाद साधताना ठाकरे यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी सांगितले की, आजच्या सत्ताधाऱ्यांनी विरोधक असताना जे प्रश्न विचारले होते, तेच प्रश्न आता त्यांच्याकडेही माध्यमांनी विचारायला हवेत, परंतु तसे होताना दिसत नाही.