महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई
पुणे – शहरातील रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेच्या मुख्यालयासह इतर सर्व कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी काढलेल्या आदेशानुसार, हेल्मेट न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या आवारात प्रवेश नाकारला जाईल तसेच त्यांना वाहन पार्किंगची सुविधाही दिली जाणार नाही.
महापालिकेस हा आदेश काही महिन्यांपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेला होता, ज्याची अंमलबजावणी आता प्रभावीपणे सुरू करण्यात आली आहे. या आदेशात स्पष्टपणे नमूद आहे की, महापालिकेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला हेल्मेट वापरावे लागेल, अन्यथा त्यावर कडक कारवाई केली जाईल.
रस्ते अपघात रोखण्यावर भर
देशात आणि राज्यात दुचाकी अपघातांमध्ये वाढ होत आहे. हेल्मेटचा वापर अपघातात जीवितहानी टाळू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. न्यायमूर्ती सप्रे यांच्या सूचनेनुसार, प्रशासनाने दुचाकी चालकांसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी व जनजागृती करावी, असे निर्देश दिले होते. विभागीय आयुक्तांनी सर्व शासकीय कार्यालयांना या संदर्भात आदेश काढले होते आणि आता महापालिकेतही त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे.
पालन न करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्या आदेशानुसार, हेल्मेट नियमांचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर दंड आकारला जाईल तसेच त्याची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात केली जाईल.