पुणे शहर : अल्पवयीन मुलीची गळफास घेत आत्महत्या, तर तिची मैत्रीण दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत; येरवड्यातील घटनेने खळबळ
पुणे : येरवडा परिसरातील वडार वस्ती येथील लक्ष्मी नगरमध्ये एका 16 वर्षाच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तनिषा शांताराम मनोरे (वय-16) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.
तनिषाची मैत्रीण जास्त प्रमाणात दारू प्यायल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
तनिषाची 16 वर्षीय मैत्रीण तिच्याच घरी दारू प्यायल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यांनी एकत्र येऊन दारू प्यायली होती, ज्यामुळे अती दारु सेवनामुळे त्यांनी उलट्या केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळ यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिषा मनोरे आणि तिची मैत्रीण येरवडा पोलीस ठाणे हद्दीतील वडार लक्ष्मी नगर परिसरात राहतात. मुली आपल्या ओळखीच्या 16 वर्षीय मुलाला फोन करून त्याच्या घरी आल्या होत्या. तो घरी आल्यावर त्याने तनिषाला गळफास घेतल्याचे आढळले. त्याने तिला खाली उतरवून तिच्या तोंडावर पाणी मारले.
त्यानंतर तिच्या आईला घटनेबाबत माहिती देऊन बोलवून घेतले. तनिषाला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तनिषाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.
तिच्यासोबत असलेली मैत्रीण जास्त प्रमाणात दारू प्यायल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत दिसली होती. तिच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली असून तिलाही उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.