दिवाळीत ‘गिग’ कामगारांचा संप : संपामुळे स्विगी, झोमॅटोसह इतर ऑनलाइन डिलिव्हरी सेवा ठप्प होणार
पुणे : ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या ओला, स्विगी, झोमॅटो, अर्बन कंपनीसह विविध डिजिटल मंचांवरील गिग कामगारांनी दि. ३१ ऑक्टोबर रोजी संप पुकारला. दिवाळीच्या काळात गिग कामगारांनी मोबाईल बंद ठेवून ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामुळे ग्राहकांना ऑनलाइन सेवांमध्ये मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
देशातील पहिली महिला गिग कामगार संघटना, ‘द गिग अँड प्लॅटफॉर्म सर्व्हिसेस वर्कर्स’ ने या संपाची हाक दिली आहे. हा संप देशभरात पसरला असून, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांतील १० ते १५ हजार गिग कामगार या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
गिग कामगारांना न्यायाची मागणी
या संपामागील कारणे स्पष्ट करताना संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा नीशा पवार यांनी सांगितले की, “गिग कामगारांना किमान वेतन, आरोग्य सुविधा, सुरक्षित कार्यपरिसर यांसारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. कंपन्यांकडून त्यांच्या विरोधात जाचक अटी लादल्या जात आहेत आणि त्यांना अन्यायकारक वागणूक दिली जाते.” पवार यांनी म्हटले की, या सर्वांसाठी न्याय मिळावा, या हेतूने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
सरकारी योजनांचा लाभ मिळवण्याची मागणी
गिग कामगारांना कायमस्वरूपी कामगार मान्यता मिळावी, ही संघटनेची मुख्य मागणी आहे. या मान्यतेद्वारे त्यांना इतर कामगारांप्रमाणे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, निवृत्तिवेतन योजना, कर्मचारी विमा योजनेसारख्या सामाजिक सुरक्षा लाभांचा हक्क मिळेल, असे पवार यांनी नमूद केले.
गिग कामगारांच्या मुख्य मागण्या
1. कंपन्यांनी गिग कामगारांसाठी जाचक अटी रद्द कराव्यात.
2. किमान वेतनाची हमी द्यावी.
3. सुरक्षित कार्यपरिसराची निर्मिती करावी.
4. आरोग्य आणि सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात.
5. कंपन्यांनी पारदर्शक कार्यपद्धती राबवावी.
6. सरकारने ऑनलाइन कंपन्यांसाठी नियामक चौकट आखावी.
या संपामुळे सणासुदीत ग्राहकांना ऑनलाईन सुविधांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे.