पुणे शहर: तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडणार्या टोळीला बेड्या: दीड लाखांचा माल जप्त; येरवडा पोलिसांची कारवाई – व्हिडिओ
पुणे : येरवड्यातील ऐतीहासीक पांडवकालीन तारकेश्वर मंदिरात दानपेटी फोडून मुद्देमाल चोरून पोबारा करणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 4 जून 2024 ला मध्यरात्री दीड ते पहाटे पाऊणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली होती.
स्वरुप राजेश चोपडे (वय-21, सध्या रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली, पुणे, मुळ रा. नागपूर), अथर्व वाटकर, या दोघांना अटक करण्यात आली आहे.
तर त्यांचे साथीदार राजन पटेल, अक्षय साहू, अमित शेरीया (सर्व रा. नागपुर शहर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटकेतील दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी 1 लाख 5 हजार रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली 40 हजार रुपयांची चोरीची दुचाकी असा 1 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरात ऐतीहासीक पांडवकालीन तारकेश्वर मंदिर आहे. या मंदिरात देवस्थानच्या सुरक्षिततेसाठी ट्रस्टकडून सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. पावती देवून देणगीदारांकडून देणगी स्विकारली जाते, तसेच गुप्त देणगीदारांसाठी गुप्त दान पेटयांची व्यवस्था मंदिरात करण्यात आली आहे.
दरम्यान, 4 जून रोजी दीड ते पहाटे पाऊणे सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने या मंदिरात प्रवेश केला होता. मंदिरात असलेल्या स्टिलच्या ६ दानपेट्या फोडून त्यातील अंदाजे 2 लाख रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली होती. याप्रकरणी सुधीर वसंतराव बांबुरे (वय-६७ रा. शनी मंदिर, येरवडा गाव यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाबाबत पावसाळी अधिवेशन 2024 ला विधान परिषदेमध्ये मंदिरातील चोरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास येरवडा पोलीस करीत असताना तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटिल व त्यांच्या पथकाने पुणे ते अहिल्यानगरपर्यंत जवळपास 200 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलीस हवालदार किरण घुटे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन या महत्वपूर्ण गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले. सदर गुन्ह्यातील आरोपीला रविवारी (ता. 04) अटक केली.
दरम्यान, आरोपीकडे चौकशी केली असता, त्याने त्याचे इतर साथीदारांसह सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली. तसेच याच गुन्ह्यातील आरोपी अथर्व बाटकर याला नागपूर शहर येथून अटक केली. आरोपींकडून चोरी केलेली 1 लाख 5 हजार रुपयांची रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली 40 हजार रुपयांची चोरीची दुचाकी असा 1 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सदरची मोटारसायकल ही चंदननगर पोलीस ठाण्यातून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग प्रांजली सोनवणे, येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, गुन्हे शाखेचे निरीक्षक छगन कापसे, श्रीमती पल्लवी मेहेर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, पोलीस नाईक सागर जगदाळे, प्रविण खाटमोडे, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, विशाल निलख यांनी केलेली आहे.