शिरवळमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; पुणेकरांसह ४४ जण अटकेत, १ कोटींचा माल जप्त

2

शिरवळ, प्रतिनिधी: विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरवळ पोलीस आणि सातारा पोलिसांनी मिळून काल रात्री एका मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून तब्बल ७० ते ८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथे रात्री १० ते ११ दरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या ठिकाणी टेबल, खुर्च्या, कुलर, फॅन, काऊंटर, चारचाकी व दुचाकी वाहने आणि हजारो रुपयांची रोकड अशी विविध साहित्य जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

बेकायदा अड्ड्यावर मोठी कारवाई; ४२ जणांवर गुन्हे दाखल

शिरवळ पोलीस ठाणे आणि सातारा ग्रामीण पोलीस यांच्याकडून संयुक्तपणे करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये अंदाजे ५ ते ६ लाखांची रोख रक्कम, १५ दुचाकी आणि ५ ते ६ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. एकूण ४२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलीस दुर्लक्ष करतात? नागरिकांचा संताप

या कारवाईमुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिरवळ परिसरात अनेक बेकायदा जुगार अड्डे कार्यरत असून, काही काळानंतर हे अड्डे पुन्हा सुरू होतात, असा नागरिकांचा आरोप आहे. या अड्ड्यांमुळे तरुणांची दिशाभूल होत असून, अनेक कुटुंबांची वाताहात झाली आहे. शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा धंदे वाढत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

जुगार अड्ड्यावर कोणाचा वरदहस्त?

कडक कारवाईची मागणी करणाऱ्या नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, हा जुगार अड्डा कोणाच्या वरदहस्तामुळे चालत होता? सातारा ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील बेकायदा धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले असतानाही हा अड्डा सुरू कसा होता, हा प्रश्न सर्वांच्या चर्चेत आहे. स्थानिक नागरिकांनी यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सातारा ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

Spread the love

2 thoughts on “शिरवळमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; पुणेकरांसह ४४ जण अटकेत, १ कोटींचा माल जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *