जि.प. उर्दू शाळा, दुधनी येथे निरोप समारंभ उत्साहात संपन्न

दुधनी (26 एप्रिल 2025) : जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, दुधनी येथे आज इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठणाने करण्यात आली.
यावेळी आठवी वर्गातील विद्यार्थिनींनी आपल्या आठवणी आणि भावना व्यक्त करत उपस्थितांचे मन जिंकले. कु. अलीना इरफान चौधरी हिने कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले व शाळेला स्वतःकडून सिलिंग फॅन भेट म्हणून दिला. तसेच सिमरन मुजावर, सिमरन बळुर्गी, आलिया दफेदार, सलोनी नदाफ आणि तंजीला नदाफ यांनीही आपल्या मनोगतातून शाळेबद्दल प्रेम व्यक्त केले.
विशेषतः, याच दिवशी शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या पहिलीतील चिमुकल्यांचेही स्वागत करण्यात आले. आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी व कन्नड-मराठी शाळेतील शिक्षक स्टाफसाठी जेवणाची व्यवस्था केली होती, ज्याचा सर्वांनी आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. युसुफ जिडगे होते. यावेळी मुस्लिम जमात अध्यक्ष श्री. जिलानी नाकेदार, आरपीआय तालुका अध्यक्ष श्री. सईदप्पा झळकी, मराठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गोरखनाथ दोडमनी, सदस्य श्री. मेहंदी मिया जिडगे, आजम शेख, मराठी शाळेचे श्री. पोमू राठोड सर, कन्नड शाळेचे मुख्याध्यापक श्री. टोणगे सर व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. महेबूब कोरबू सर व श्री. फैय्याज सुतार सर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. तारीक सय्यद सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.