कॉलेजांच्या शुल्क व अनामत रकमेवर FRA चे निर्बंध; नियमभंग केल्यास कारवाईचा इशारा

पुणे – राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेजांनी ठरवलेल्या रकमेपेक्षा अधिक शुल्क किंवा अनामत रक्कम घेतल्यास थेट कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा शुल्क नियामक प्राधिकरणाने (FRA) दिला आहे. गुरुवारी (७ ऑगस्ट) प्रसिद्ध परिपत्रकाद्वारे FRA ने विद्यार्थी आणि पालकांना कॉलेज प्रशासनाला न घाबरता तक्रार करण्याचे आवाहन केले.
राज्यातील अनेक कॉलेजांनी FRA च्या सूचनांकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांकडून जादा शुल्क आकारल्याचे समोर आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर आर्थिक भार पडत असल्याचे निदर्शनास आले. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर FRA प्रशासनाने कारवाईचा इशारा देत हालचाल सुरू केली. FRA चे सचिव डॉ. अर्जुन चिखले यांनी या संदर्भात परिपत्रक काढले.
FRA ने विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या अनामत रकमेची कमाल मर्यादा अभ्यासक्रमनिहाय पाच ते ५० हजार रुपयांच्या दरम्यान निश्चित केली आहे. ही रक्कम केवळ एकदाच आकारण्याची आणि अभ्यासक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना परत करण्याची अट घालण्यात आली आहे. वेगवेगळ्या नावाखाली अतिरिक्त रक्कम आकारण्यास मनाई आहे.
अधिनियम २०१५ मधील कलम १४(५) नुसार, कोणतीही संस्था एका शैक्षणिक वर्षात एका वर्षाच्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क घेऊ शकत नाही. नियमभंग केल्यास कलम २० अंतर्गत थेट दंडात्मक कारवाई होणार आहे. प्रवेश प्रक्रियेत नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश FRA ने दिले आहेत.
तसेच, अनेक संस्थांकडून वसतिगृह आणि मेस सुविधांसाठी अनिवार्य शुल्क आकारले जात असल्याची तक्रार आहे. FRA ने या सुविधा विद्यार्थ्यांसाठी वैकल्पिक ठेवण्याचा आदेश दिला असून, त्यासाठी सक्ती करू नये किंवा वेगळे शुल्क लावू नये, असा इशारा दिला आहे.