पुण्यात बनावट जामीनदार रॅकेट उध्वस्त: ११ जणांना अटक, पोलिसांचा मोठा खुलासा

पुणे: गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बनावट जामीनदार तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वानवडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने या प्रकरणी ११ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
लष्कर कोर्ट आवारात सापळा, मोठा घोटाळा उघड
या रॅकेटमध्ये आरोपी बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड आणि ७/१२ उतारे तयार करून न्यायालयात सादर करत होते. ४ जानेवारी २०२५ रोजी लष्कर कोर्ट आवारात सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. यावेळी मोठ्या प्रमाणात संशयास्पद कागदपत्रे सापडली, ज्यामध्ये ९५ संशयित रेशनकार्ड, ११ संशयित आधारकार्ड, तसेच इतर बनावट कागदपत्रांचा समावेश आहे.
वकिलांचा आणि कोर्ट कर्मचाऱ्यांचा सहभाग
या रॅकेटमध्ये काही वकील आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. आरोपी न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करून जामिनासाठी आवश्यक ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवत होते. यामुळे न्यायालयाची दिशाभूल करून अनेक गंभीर गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यात आला होता.
पोलिसांचा पुढील तपास सुरू
या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू असून, आणखी काही आरोपी लवकरच गजाआड होण्याची शक्यता आहे. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.