लाचलुचपत विभागाच्या कारवाईने पोलिस दलात खळबळ; लाच प्रकरणी कुंडलवाडी पोलिस ठाण्यातील दोन अधिकारी निलंबित!
नांदेड : बिलोली तालुक्यातील गंजगाव वाळू घाटावरून वाहतूक करण्यासाठी १७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे आणि पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना २३ जानेवारी रोजी लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन करून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
लाच घेताना रंगेहाथ पकडले!
गंजगाव वाळू घाटावरून वाहतूक करण्यास कायदेशीर परवानगी असतानाही ठेकेदाराकडून १७ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. यासंदर्भात तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून दोन्ही अधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यातच लाच घेताना रंगेहाथ पकडले.
न्यायालयीन कोठडीत रवानगी
अटक केल्यानंतर भागवत नागरगोजे आणि नारायण शिंदे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर बिलोली न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. यासंदर्भात ३१ जानेवारी रोजी बिलोली येथील प्रथमवर्ग न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
पोलीस दलाची प्रतिमा मलिन
पोलिस ठाण्यातच लाच घेताना दोन अधिकारी पकडल्याने पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली आहे. या प्रकारामुळे गुन्हेगारी रोखण्यासाठी असलेले पोलीस अधिकारीच भ्रष्टाचारात अडकले असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
पोलीस अधीक्षकांची तातडीची कारवाई
या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
हा प्रकार उघड झाल्याने पोलीस दलातील भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी आणखी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.